संयुक्त पाने म्हणजे काय?www.marathihelp.com

पानांचे प्रकार : पानांचे दोन मुख्य प्रकार आहेत.

(१) साधी पाने : या पानांमध्ये पर्णदल एकच असून पानांची कडा अखंड असते; उदा., जास्वंद, आंबा, पेरू.

(२) संयुक्त पाने : या पानांमध्ये पर्णदल खंडित असून त्याची कडा मुख्यशिरेपर्यंत पोहोचून पर्णिका तयार होतात; उदा., गुलमोहर, बाभूळ. संयुक्त पानांचे मुख्यशिरेवरील (प्राक्ष) पर्णिकांच्या रचनेनुसार पिच्छाकृती व हस्ताकृती असे दोन प्रकार केले जातात.

पिच्छाकृती संयुक्त पान : या पानांमध्ये मुख्य प्राक्ष एकच असून त्यावर दोन्ही बाजूंनी पर्णिका असतात. त्यामुळे पानाला पिसाप्रमाणे आकार येतो. पिच्छाकृती पानांचे पुढील उपप्रकार आहेत : (१) एकपिच्छक : या प्रकारात एकच प्राक्ष असून त्याच्या दोन्ही बाजूंना पर्णिका असतात. त्याचे दोन प्रकार आहेत. (अ) असमपिच्छक : या प्रकारात पर्णिकांची संख्या विषम असते. त्यामुळे प्राक्षाच्या टोकाला एकच पर्णिका असते; उदा., कडूलिंब. (आ) समपिच्छक : या प्रकारात पर्णिकांची संख्या सम असते. त्यामुळे प्राक्षाच्या टोकाला पर्णिकांची जोडी असते; उदा., शिरीष. (२) द्विपिच्छक : या प्रकारात प्रथम प्राक्षाच्या दोन शाखा असून त्यावर पर्णिका असतात; उदा., बाभूळ, लाजाळू. (३) त्रिपिच्छक : या प्रकारात प्रथम प्राक्षाच्या शाखांना पुन्हा असलेल्या शाखांवर पर्णिका असतात; उदा., शेवगा. (४) विसंयुक्त : या प्रकारात पिच्छाकृती पान त्रिपिच्छकाहून अधिक खंडित असते; उदा., कोथिंबीर, बडिशेप, जिरे, गाजर.

हस्ताकृती संयुक्त पानांचे प्रकार

हस्ताकृती संयुक्त पान : संयुक्त पानाच्या या प्रकारात पर्णिका मुख्य प्राक्षाच्या टोकावर असतात. पर्णिकांच्या संख्येवरून त्याचे पुढील उपप्रकार केले आहेत. (१) एकपर्णकी : या प्रकारात मुख्य प्राक्षाच्या टोकावर एकच पर्णिका असते; उदा., लिंबू, पपनस. (२) द्विपर्णिकी : या प्रकारात प्राक्षाच्या टोकाला दोन पर्णिका असतात; उदा., रेग्नेलिडियम (नेच्याचा एक प्रकार). (३) त्रिपर्णिकी : या प्रकारात प्राक्षाच्या टोकावर तीन पर्णिका असतात; उदा., बेल, वायवर्णा. (४) चतु:पर्णिकी : या प्रकारात प्राक्षाच्या टोकावर चार पर्णिका असतात; उदा., मार्सेलिया (नेच्याचा एक प्रकार). (५) बहुपर्णिकी (किंवा अंगुल्याकार) : या प्रकारात प्राक्षाच्या टोकावर चारपेक्षा अधिक म्हणजे ५, ७ किंवा ९ पर्णिका एकाच ठिकाणी असतात. त्यामुळे हाताची बोटे फाकल्यासारखा आकार दिसतो; उदा., शाल्मली.

solved 5
General Knowledge Friday 28th Oct 2022 : 13:40 ( 1 year ago) 5 Answer 3404 +22